हॅकर मनीष भंगाळेचा खळबळजनक दावा ! : ड्रग्ज प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी पाच लाखांची मिळाली ऑफर
मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात दररोज दावे-प्रतिदावे होत असतानाच आर्यन प्रकरणात हॅकर मनीष भंगाळे यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी पाच लाखांची ऑफर दिल्याचा दावा मनीषने केला आहे. मनीष भंगाळे याला भेटण्यासाठी जळगावला 6 ऑक्टोबर रोजी आलोक जैन आणि शैलेश चौधरी असे दोन जण आले होते. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. त्याने काही नंबर सांगितलं. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होतं. त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते. तसेच त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सअॅप चॅट आहे. ते मॉडीफाय करून टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मोबाईलमध्ये जी फाईल या संदर्भातील होती ती आर्यन खान व्हॉट्सअॅप चॅट या नावाने होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितला तसेच यासाठी पाच लाख रुपये देऊ, असे मनीषने सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
तो नंबर सॅम डिसूजाचा
मनीष भंगाळे पुढे म्हणाले की, त्यांनी मला खूप आमिषे दाखविली. त्यांनी मला दहा हजार रुपये दिले. मी ते घेऊन निघून आलो. मी त्यांचे नंबर ट्रू कॉलरला चेक केलं तर सॅम डिसूजा म्हणून दिसलं. याबाबत मी मुंबई पोलिसांना केंद्रीय गृहमंत्रालय तसेच महाराष्ट्र गृहमंत्रालयाला पत्र पाठवले असल्याचे भंगाळे यांनी सांगितले आहे.

