बिजासनी घाटात विचीत्र अपघात : अपघातात चौघे मयत नाशिक जिल्ह्यातील रहिवासी
शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील राज्य सीमेवरील पळासनेरजवळ उतारावर इंदौरकडून शिरपूरकडे येणार्या मार्गावर सात ते आठ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर एका बाजूची वाहतूक खंडित झाल्यानंतर ती दुसर्या बाजूने वळवण्यात आली आहे. अपघाताचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील राज्य सीमेवरील पळासनेरजवळ बुधवारी रात्री सात ते आठ वाहने एकमेकांवर जोरदारपणे आदळल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर एका कारमधील चार जण मयत झाल्याचे सांगण्यात आले. अपघातात चौघे मयत नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सुळे-पिंपळे गावातील रहिवासी असल्याचे समजते. कपडे विकत घेण्यासाठी संबंधित सेंधवा येथील शोरूममध्ये गेल्याचे समजते. या अपघातात दहावर जण गंभीर झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस व नागरीकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले.


अपघातात भुसावळचे उद्योजक महेंद्र अग्रवालांसह तिघे जखमी
बिजासनी घाटाजवळ झालेल्या अपघातात भुसावळचे प्रसिद्ध उद्योजक महेंद्र अग्रवाल यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. अग्रवाल हे चालक रहेमान (भुसावळ) व मॅनेजर सुरेंद्र भाई (नाशिक) यांच्यासह क्रेटा (एम.एच.19 सी.ई.1222) ने इंदौरे येथे व्यवसायाच्या कामानिमित्त गेले होते. इंदौरहून परतत असताना त्यांच्या वाहनाला घाटात मागावून आलेल्या वाहनाने जबर धडक दिली तर त्यांचे वाहन पुढे चालणार्या वाहनावर आदळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले तर सुदैवाने एअर बॅग उघडल्याने अग्रवाल यांच्यासह तिघांना केवळ मुका मार लागला. अपघात घडला त्याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रेलर येत होता मात्र चालकाने प्रसंगावधान राखून ट्रेलर रस्त्याखाली उतरवला अन्यथा मोठी प्राणहानी होण्याची भीती होती, असे सांगण्यात आले.