प्रवाशांना मोठा दिलासा : एस.टी.कर्मचार्यांचा बेमुदत बंद मागे
महागाई भत्ता 28 टक्क्यांवर : परीवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई : विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचार्यांनी गुरुवारपासून बेमुदत बंद पुकारल्याने राज्यभरात एस.टी.ची चाके थांबल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. कर्मचार्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आल्याची माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आता हा बंद कर्मचार्यांनी मागे घेतला आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने बेमुदत बंदची हाक दिली होती.
महागाई व घरभाडे भत्त्यात वाढ
कर्मचार्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केली. एस.टी.कर्मचार्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने गुरुवार, 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचार्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री परब यांनी मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकार्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करुन तोडगा काढला. परीवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण आज मध्यरात्रीपासून 12 पासून मागे घेऊन राज्यभरातील एसटीची वाहतूक सुरळीत सुरु होईल असे आश्वासन महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने जाहीर केले.

अन्य मागण्यांसाठी दिवाळीनंतर बैठक
या बैठकीत एसटी कर्मचार्यांच्या विविध मागण्या, एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करुन एसटी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध खात्याचे महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते.
