टेम्पो कंटेनरवर धडकला : दोघे जागीच ठार
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे, खारेगावजवळ भरधाव टेम्पो कंटेनरवर आदळून झालेल्या अपघात दोघे ठार झाले. रविवारी सकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पोचालक सलमान खान (34) याच्यासह क्लिनर फिरोज खान (32) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे या महामार्गावरील ठाण्याकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर खोळंबली.
अपघातामुळे वाहतूक खोळंबी
सलमान हा फिरोजसह कोंबड्यांनी भरलेला टेम्पो घेऊन नाशिकहुन ठाण्यात येत होता. याचदरम्यान ठाण्यातील खारेगाव जवळ तो टेम्पो पुढे असणार्र्या कंटेनरला जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पो चालकासह क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, कळवा वाहतूक पोलीस आणि अगिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. चालक आणि क्लिनरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघातामुळे वाहनांमधील तेल रस्त्यावर सांडले होते. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. सुमारे एक तासाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर ठाण्याकडे येणारी वाहतुक सुरळीत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

