अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जेईई व नीट साठी ‘महाज्योती’वर मोफत नोंदणी करा
राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचे आवाहन
भुसावळ : इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिकत असलेल्या ओबीसी, व्हीजे एन.टी.व एस.बी.सी.प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती पोर्टलवर आपली नोंदणी करावी व जेईई, नीट व सीईटी 2023 साठी मोफत प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जळगांव जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी शासनाची योजना
महाविकास आघाडी शासनाच्या महाज्योती पोर्टलवर सन 2021-22 मध्ये अकरावी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी व एस.बी.सी.प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ही योजना आहे. ओबीसी समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना भरपूर फी भरुन जेईई, सीईटी व नीट परीक्षेसाठी खाजगी क्लास लावता येत नाहीत म्हणून महाविकास आघाडी शासनाने ही योजना सुरू केली आहे. यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रतीचा टॅब व दररोज 6 जीबी इंटरनेट डाटा मोफत मिळणार आहे. महाज्योतीतर्फे 14 नोव्हेंबर पासून जेईई, नीट व सीईटीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी www.mahajyoti.org.in ह्या वेबसाईटवर 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करायची आहे. त्यानंतर नोंद केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 जीबी इंटरनेट डाटा ऑनलाईन क्लाससाठी मिळणार आहे. या योजनेचा फायदा यंदा 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे, यावर्षी बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. महाविकास आघाडी शासनाच्या विद्यार्थी उपयोगी योजनेचा ओबीसी, व्हीजे एन.टी. व एस.बी.सी.प्रवर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे.

