अपघाताचा बनाव करीत टाकला दरोडा : तिघे दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात


सांगोला : सांगोला तालुक्यातील एखतपुर-आचकदाणी रोडवर दुचाकी कारचा अपघात झाल्याचे बनाव करून दुचाकीवरील दोघांकडून सोने लुटणार्‍या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले. पोलिसांनी गुन्ह्यातील सुमारे 45 लाख 81 हजार 522 रुपये किमतीचे 925 ग्रॅम, 560 मिली वजनाचे सोन्याचे बिस्किट (मुद्देमाल) जप्त केला. या गुन्ह्यात पोलिसांनी दीपक प्रकाश जावडेकर (23, रा.दिघंची, ता.आटपाडी, जि.सांगली), अनिल चंद्रकांत भोसले (23, प्रकाश नगर, गल्ली नंबर 2, अहिल्यानगर-महादेवनगर, ता.मिरज, जि.सांगली) व प्रशांत पाटील (21, खामकरवाडी, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कर्ज डोईजड झाल्याने केला गुन्हा
याबाबत सुशांत बापुसो वाघमारे (दिघंची, ता.आटपाडी) याने 10 नोव्हेंबर रोजी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध भादंवि सं.का.क 394,397,279,427 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मिरज येथील इसमांकडे चौकशी केली असता त्यातील इसम हा सांगलीतील होमगार्ड असून तो व्यसनाधीन आहे तर दुसरा इलेक्ट्रिक दुकानात सेल्समन म्हणून कामास असून शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने कर्ज बाजारी झाला आहे. त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले .सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे .

यांच्या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पुणे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, फौजदार ख्याजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोयेकर, चालक समीर शेख, सांगोला पोलीस स्टेशनचे राहुल देवकाते, राहुल मोरे, सायबर सेलचे अन्वर अत्तार यांनी केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !