रावेर तालुक्यात पाच ग्रामसेवकांचे अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र अखेर रद्द
रावेर : अपंगत्व आले नसतानाही खोटे प्रमाणपत्र मिळवून त्याचा तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांनी लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आल्यानंतर या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने चौकशीअंती रावेर तालुक्यातील पाच ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने खोटे प्रमाणपत्र मिळवणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
खोट्या दाखल्यांमुळे ग्रामसेवक आले होते चर्चेत
रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले मिळवून नोकरीत बदली करण्यासाठी व सोयी लाटण्यासाठी त्यांचा वापर केला होता. धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्रिस्तरीय समितीने हे दाखले रद्द केले असून रद्द करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात नितीन दत्तू महाजन, राहुल रमेश लोखंडे, रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी, छाया रमेश नेमाडे, शामकुमार नाना पाटील या ग्रामसेवकांचा समावेश आहे. संबंधित ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी व इतर लाभ घेण्यासाठी या सर्टिफिकेटचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईबाबत पंचायत समितीकडून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवणार येणार आहे.


