वाशीमधील ‘तो’ बार समीर वानखेडेचा ! : नवाब मलिकांचा दावा
मुंबई : राष्ट्रवादी प्रवक्ते यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखीन एका आरोपांद्वारे निशाणा साधल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मलिक यांनी एका रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. नवी मुंबईतील वाशी येथे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सदगुरू असून उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला असून, 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र
नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर सद्गुरू रेस्ट्रो बारचा फोटो शेअर केला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.


समीर वानखेडेंनी बारबाबत दिले स्पष्टीकरण
या संदर्भात समीर वानखेडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्या संदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच 2006 पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणार्या कमाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
वानखेडेंच्या अडचणी वाढल्या : व्यक्तीगत वादातून आपल्या घरात ड्रग्ज ठेवले
समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोपही केले जात आहेत. अशातच समीर वानखेडेंविरोधात आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाने वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. व्यक्तिगत वादातून वानखेडे यांनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी हे सगळे केल्याचा मोठा दावा झैद राणा याने केला आहे.