प्रेमभंगानंतर इंटर्न महिला डॉक्टरावर गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला : आरोपी जाळ्यात
नागपूर : प्रेमभंग झाल्यानंतर इन्टर्न लेडी डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न करून तीन दिवसांपूर्वी नागपुरातून पळून गेलेला आरोपी विक्की राधेशाम चकोले (वय 28, रा. वलनी, सावनेर) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून पिस्तुलाचे मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पुण्याला पळून गेल्यानंतर तो पुन्हा हत्येच्या हेतूने नागपुरात आल्याचे उघड झाले आहे.
प्रेमभंगानंतर तरुण झाला अस्वस्थ
आरोपी विक्कीचे या तरुणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते लग्नही करणार होते मात्र दिरंगाई झाली अन् नंतर ती दुसरीकडे कनेक्ट झाल्याने विक्कीला टाळू लागल्याचा त्याचा आरोप आहे. तिच्यासाठी काहीही करायला तयार असल्याने तिच्या दगाबाजीने विक्की चिडला होता. त्यामुळे 22 नोव्हेंबरला तो तिला भेटण्यासाठी मेडिकलमध्ये गेला. तिने त्याच्याशी संबंध तोडल्याचे स्पष्ट केल्याने त्याने पिस्तुलातून तिच्यावर तीन वेळा फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुल लॉक झाल्याने मॅगझिन बाहेर आले. जिवाच्या धाकाने तरुणीने आरडाओरड केली अन् तिचे सहकारी धावून आल्याने विक्की पळून गेला. तो बैद्यनाथ चौकातून ट्रॅव्हल्सने पुण्याला पळून गेला. तेथे एका मित्राच्या रूमवर तो पोहोचला. मात्र, त्याच्या गुन्ह्याची माहिती प्रसारमाध्यमांतून कळल्याने मित्राने त्याला तेथून हाकलून लावले. त्यामुळे तो तेथून ट्रकने पुन्हा नागपूरकडे परतला. बुधवारी रात्री वाडीत उतरल्यानंतर ऑटोने मेडिकल चौकात आला. मेडिकल परिसरात त्याने पहाटेपर्यंत इकडून तिकडे चकरा मारल्या. ती दिसल्यास तिची हत्या करायची, असे त्याने ठरविले होते. मात्र, ती दिसली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

