शेततळ्यात बुडाल्याने दोघा शाळकरी मुलांचा करुण अंत
नांदेड : पोहण्यासाठी शेततळ्यात गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना देगलूर तालुक्यातील कावळगड्डा येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अक्षय रोहिदास राजूरे (12) व प्रमोद हणमंत राजूरे (12) अशी मृत मुलांची नावे आहेत.
बुडाल्याने चिमुकल्यांचा करुण अंत
देगलूर येथील रामचंद्र पाटील प्राथमिक विद्यालयात इयत्ता सहावीचे शिक्षण घेत असलेला अक्षय रोहिदास राजूरे (12), कावळगड्डा जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता सातवीचे शिक्षण घेणारा प्रमोद हणमंत राजूरे (12) व गावातील नागनाथ गणेश कुरे (11) हे तिघे शौचालयासाठी गावाजवळील एका शेतात गेले होते. या ठिकाणावरुन अक्षय, प्रमोद व नागनाथ हे तिघे गावच्या बाजूला असलेल्या दिलीप खुशालराव जाधव यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतू, अक्षय व प्रमोदला पोहता येत नव्हते. ग्रामस्थ वाचवायला येईपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले.

