निवृत्त महिला डॉक्टरची खुर्चीला बांधून व गळा चिरून निर्घृण हत्या
नागपूर : निवृत्त महिला डॉक्टरची अज्ञात आरोपींनी खुर्चीला बांधून आणि गळा चिरून निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर उपराजधानीत मोठी खळबळ उडाली. नंदनवन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. देवकीबाई जीवनदास बोबडे ( ७८) असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट
नंदनवन पोलिस ठाण्यातील गायत्री कॉन्हेंट परीसरात देवकीबाई बोबडे मुलगी आणि जावयासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा डॉक्टर असल्याचे समजते. ते शनिवारी सकाळी कर्तव्यावर निघून गेले. दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० पर्यंत देवकीबाई घरात एकट्याच होत्या. अशात त्यांच्या घरात अज्ञात आरोपी शिरले व त्यांनी वृद्धेला खुर्चीला बांधले व आरोपींनी देवकीबाई यांचे तोंडात कापड कोंबून धारदार शस्त्राने गळा त्यांचा चिरला असावा, असा संशय आहे. रात्री ७ च्या दरम्यान नातेवाईक घरात आल्यानंतर त्यांना देवकीबाई मृतावस्थेत दिसल्या. त्यांचा गळा चिरला होता. खुर्चीला दोन्ही हात बांधून होते. खाली रक्ताचे थारोळे साचून होते. त्यामुळे नातेवाईकांनी आरडाओरड केली. ती ऐकून शेजारी धावले अन् अंगावर काटा उभा करणारे दृष्य बघून त्यांनी नंदनवन पोलिसांना सूचना दिली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

