जनार्दन महाराज म्हणजे सर्व धर्म पंथ समन्वयाचार्य

आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज : मुक्ताईनगरात श्री संत संमेलनाचा संत-महंतांच्या उपस्थिती समारोप


मुक्ताईनगर : सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात सतपंथ संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाची सांगता सर्वधर्मीय पंथाच्या संतांच्या उपस्थितीत भव्य संमेलन घेऊन करणे ही भारताच्या अखंडतेसाठी व सनातन हिंदू धर्माच्या ऐक्यासाठी गौरवास्पद कार्य असून श्री जनार्दन हरीजी महाराज म्हणजे सर्व धर्म, पंथ समन्वय आचार्य असल्याचे भागवत कथाकार आचार्य अमृत आश्रम स्वामी महाराज यांनी सांगितले. संत संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

शिवराज्य येण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे
भाविक भक्तांना आशीर्वचन देताना अमृत आश्रमस्वामी महाराज म्हणाले की, भाषा, भेद, प्रांत, गोत्र, लिंग, पंथ संप्रदाय आणि पक्ष बाजूला ठेवून भारताच्या ऐक्यासाठी पुन्हा रामराज्य होण्यासाठी आणि महाराष्ट्रात शिवराज्य होण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे काळाची गरज आहे. हे कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज करीत असल्याचा सार्थ अभिमान आहे. 2010 मध्ये त्यांनी फैजपूर येथे भरविलेल्या ऐतिहासिक संत संमेलनाची आठवण करून दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताई संस्थानचे हभप श्री रवींद्र महाराज हरणे होते.

सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्यच : जनार्दन महाराज
सतपंथ परीवारातर्फे आयोजक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात मला ही सेवा करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य आहे. हाच माझा सत्कार आणि माझी योग्यता आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करून मीच माझ्या खात्यातील बॅलन्स वाढविला आहे आणि तो बॅलन्स ‘जीवन के साथ भी और जीवन के बाद भी’ असा आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात संबंधी त्यांनी सांगितले की, नद्या अनेक असतात मात्र त्यांचे ध्येय एकच असते समुद्राला जाऊन एकरूप व्हावे तसेच हिंदू संस्कृती व भारताच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे हेच या संत संमेलनाचे ध्येय आहे.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
या संत संमेलनासाठी व्यासपीठावर संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज, आचार्य मानेकर बाबा शास्त्री, महंत श्रीकृष्ण गिरीजी महाराज, श्री महंत भरतदासजी महाराज, शास्त्री भक्ती स्वरूप दासजी, संत स्वरूपानंद जी महाराज, संत श्री मधुरानंदजी महाराज, डॉ.सचिन जी पाटील, हभप रवींद्र हरणे बाबा महाराज, संत श्री श्याम चैतन्यजी, संत श्री ब्रज चैतन्यजी, संत श्री हरीश चैतन्य जी, संत पांडुरंग दासजी महाराज, दीपक भगतजी, हभप उद्धव महाराज, नितीन महाराज, विशाल महाराज, कन्हैया महाराज, गजानन वरसाडेकर महाराज असे वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे संत श्री उपस्थित होते.

जनार्दन महाराज यांचा गौरव
आदिशक्ती मुक्ताईचे आमंत्रण स्वीकारून भागवत कथा व नामसंकिर्तन सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल सनातन हिंदू धर्म संस्कृतीतील विविध, अनेक पंथ, उपासना पद्धती यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी भेदाभेद विसरून सर्व संतांना एकत्र करण्याचे दिव्य तसेच प्रशंसनीय कार्य करत असल्याबद्दल महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना श्री मुक्ताई संस्थान कडून हभप रविंद्र महाराज हरणे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी एकनाथराव खडसे यांनी उपस्थित सर्व संतांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, विनोद सोनवणे, नरेंद्र नारखेडे यांच्यासह परीसरातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या संत संमेलनाआधी प्रसिद्ध कीर्तनकार हभप रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले. गेल्या सप्ताहापासून या धर्ममंडपात हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती दिली. याबद्दल आयोजक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमानंतर धानोरा व परीसरातील भाविकानी मांडे भोजनाची व्यवस्था केली होती. ही संत मुक्ताई यांच्या आवडीच्या मांडे (पुरणपोळी) खीर या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !