जिल्हा बँकेत सत्तेचे ठरले सूत्र : आधी राष्ट्रवादीला नंतर सेनेला अध्यक्षपदाची संधी !
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची पत्रकार परीषदेत माहिती
जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या सत्ता वाटपाचे सूत्र गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले. पत्रकार परीषदेत याची माहिती माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्ता वाटपाच्या सूत्राची माहिती दिली. ते म्हणाले की, पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आहे. पहिले दोन वर्ष काँग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे. या अनुषंगाने उद्या अर्थात शुक्रवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
नेत्यांच्या बैठकीत ठरले सूत्र
जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात आयोजीत करण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार शिरीष चौधरी, आामदार किशोरआप्पा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संचालक प्रतापराव हरी पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


खडसे ठरवणार अध्यक्षपदाचा उमेदवार : पालकमंत्री
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने एकत्रीत निवडणूक लढवून घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार हे एकनाथराव खडसे ठरविणार असून शिवसेनेच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जशी एकत्र होती, तशीच निवडणुकीनंतरही राहणार असल्याची ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.
भाजपाचा उल्लेख अन् हास्याचे फवारे
बैठकीनंतर माध्यमांना माहिती देतांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी चेअरमनपदाविषयीची माहिती देताना ‘चेअरमनपदासाठी पहिले तीन वर्ष भारतीय जनता पार्टी’ असा उल्लेख केला मात्र याचवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिमटा घेत अजुनही मनातून गेले नाही, असे सांगताच हास्याचे फवारे उडाले. त्यावर माजी मंत्री खडसे यांनी कडी करीत सांगितले की, 40 वर्ष दिले, असे म्हणताच पुन्हा हास्यकल्लोळ झाला.