अवघ्या दोन हजार रुपयांसाठी केली एकाची हत्या


वर्धा : वर्ध्यातील नागसेन नगर परीसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या घटनेत शंभू सोनगडे यांचा मृत्यू झाला. व्याजाने घेतलेले दोन हजार रुपये परत केले नसल्याचा राग धरत आरोपीने अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे.

दोन हजार रुपये न दिल्यामुळे वाद
नागसेन नगर येथील शंभू सोनगडे यांनी एका महिलेच्या मध्यस्थीने पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील तीन हजार रुपयांचा परतावादेखील केला होता. या रकमेतील दोन हजार रुपये परत द्यायचे होते. त्याकरीता 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शैलेश येळणे (रा.पंजाब कॉलनी गजानननगर) हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने दोन तीन दिवसांत परतावा करेल, असे सांगितले. त्यावरून येळणे याचा सोनगडे यांच्याशी वाद झाला.

अंगावर गाडी घातली, फरफटत नेले
हा वाद वाढत असल्यामुळे उपस्थितांनी येळणे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला. दरम्यान, बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर नेली. त्यात गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. हा प्रकार समोरच घडत असल्यामुले लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत शंभू सोनगडे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी पंचनामा केला, तपास सुरु
घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी भेट देत पाहणी केली. येथे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !