चुकीच्या उपचार व शस्त्रक्रियेमुळे विवाहितेचा मृत्यू

मयताच्या वडीलांसह मयत विवाहितेचा पतीचा पत्रकार परीषदेत आरोप


मुक्ताईनगर : प्रसुतीसाठी दाखल केलेल्या विवाहित महिला आरती विशाल सुरवाडे (वढवे) यांचा सिझेरीयन झाल्यानंतर केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे व शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलीचे वडील अरुण वसंत सावळे (बेलसवाडी) तसेच पती विशाल विनोद सुरवाडे (वढवे) यांनी मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत केला.

डॉक्टरांवर चुकीच्या उपचारांचा आरोप
आरती विशाल सुरवाडे या विवाहित महिलेचे 13 एप्रिल 2021 पासून मुक्ताईनगर शहरातील डॉ.योगेश पाटील यांच्या शोभा हॉस्पिटलमध्ये प्रसूती पूर्व उपचार सुरू होते. 14 नोव्हेंबर 2021 रोजी आरतीला शोभा हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. डॉ.योगेश पाटील यांच्या सल्ल्याने आरती हिला जिल्हा उपरुग्णालय, मुक्ताईनगर येथे त्याच दिवशी सायंकाळी शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सिझेरीयनद्वारेला मुलगी झाली. शस्त्रक्रियेनंतर आरतीची तब्येत बरी होती मात्र तिला पुन्हा त्रास व्हायला लागला. महिलेला जास्त त्रास वाढल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शोभा हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान तिची प्रकृती खालावत असताना डॉ.योगेश पाटील यांनी आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करत उपचार व्यवस्थित केले नाही. त्यामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास तिची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर साडेबारा वाजेच्या सुमारास डॉ.योगेश पाटील यांनी तिला गंभीर परीस्थिती झाल्याने जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. जळगाव येथे पोहोचल्यानंतर दीड तासापूर्वीच निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहीर केले. यावरून डॉ.योगेश पाटील यांच्या चुकीच्या उपचार, शस्त्रक्रिया व हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू ओढवल्याचा आरोप मयताचे पिता अरुण सावळे व पती विशाल सुरवाडे यांनी केला. दरम्यान या संदर्भात मयत महिलेचे पती व वडील या दोघांनी मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून न घेता त्यांना माघारी पाठवले, असा आरोपही त्यांनी याप्रसंगी केला.

हलगर्जीपणाचा आरोप चुकीचा
शोभा हॉस्पीटलचे डॉ.योगेश पाटील यांनी चुकीचा उपचार व हलगर्जीपणाचा झाल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले. आरती सुरवाडे यांची प्रसूती ही अतिशय चांगल्या स्थितीत उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली व एक दिवस त्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होत्या परंतु त्यांना पुन्हा त्रास झाल्याने त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीरच होती. या संदर्भात मी पती व वडील या दोघांना कल्पना देऊन जळगाव येथे हलवण्याचे सांगितले होते परंतु त्यांनी आग्रह धरत जळगाव न हलवता याच ठिकाणी उपचार करण्याचे आग्रह धरल्याने आरतीची तब्येत अधिकच गंभीर बनली त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !