भुसावळ उपनगराध्यक्षा सोनी बारसेंचा राजीनामा
नगरसेवक राजेंद्र नाटकरांना मिळणार उपनगराध्यक्षपदाची संधी
भुसावळ : पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा तथा उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे यांनी सोमवारी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे सोपवला असून आगामी काळासाठी आता नगरसेवक राजेंद्र नाटकर यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे. याबाबत मात्र अद्याप उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.
पाच नगरसेवकांना संधीचे नियोजन
पालिकेच्या सत्ताधार्यांनी अखेरच्या एक वर्षांच्या काळात पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचे नियोजन केले होते. यात रमेश नागराणी, प्रमोद नेमाडे, सोनी बारसे यांना संधी मिळाली तर नगरसेवक राजेंद्र नाटकर सध्या प्रतीक्षेत आहेत. नगरसेविका सोनी बारसे यांनी 17 ऑगस्ट रोजी उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला होता. यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे रजेवर गेल्याने त्यांना प्रभारी नगराध्यक्षपदही मिळाले होते. ठरवलेला कार्यकाळ संपल्याने बारसे यांनी सोमवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे दिला आहे. उपनगराध्यक्ष या पदावर नगरसेवकांमधून निवड केली जाते. यामुळे या पदावर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर नवीन निवड प्रक्रिया होईल. मात्र पालिकेचा पंचवार्षिक कालावधी 26 डिसेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी आता तातडीने उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम जाहिर झाला तरी या पदावर वर्णी लागलेल्या उपनगराध्यक्षांना अल्प काळ मिळणार आहे. दरम्यान जेष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर यांची या पदासाठी वर्णी लागेल, असे संकेत आहेत.


