वरणगावात करवाढी विरोधात भाजपाचे स्वाक्षरी आंदोलन
करवाढ रद्दच्या मागणीसाठी 14 डिसेंबर रोजी नगरपरीषदेवर जनआक्रोश मोर्चा
वरणगाव : महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत नगरपरीषद प्रशासनाने वरणगाव शहरातील सर्व नागरीकांच्या मालमत्तेवर वृक्ष, शैक्षणिक, घनकचरा, रोजगा हमीसह शौचालय कर लादला असून या जुलमी करवाढीविरोधात भाजपाने मंगळवारी स्वाक्षरी जनआंदोलन अभियान राबवले. यावेळी प्रशासनाने वाढीव करवाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, आकाश निमकर, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, हाजी अल्लादीन शेठ, गजानन वंजारी, हितेश चौधरी, योगेश माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता पाटील-चौधरी, शामराव धनगर, माजी सरपंच सुभाष धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे, कमलाकर मराठे, प्रताप दिव्यवीर, रमेश पालवे, युवराज भोई, पप्पू ठाकरे, डॉ.नाना चांदणे, मुस्लिम भाई अन्सारी, डॉ.सादिक शेख, साबीर कुरेशी, नाना चौधरी, दीपक चौधरी यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.


14 रोजी जनआक्रोश मोर्चा
वरणगावकरांवर करवाढ करणार्या महाविकास आघाडीचा धिक्कार असो , करवाढ रद्द झालीच पाहिजे यासह भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परीसर दणाणला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी उपस्थितांसमोर सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत नगरपरीषद प्रशासनाने वरणगावकरांवर वाढवलेली करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी जनआंदोलनानंतरही करवाढ रद्द न झाल्यास मंगळवार, 14 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे. जोपर्यंत दरवाढ रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपाचा कार्यकर्ता प्रत्येक वॉर्डा-वॉर्डात जाऊन नागरीकांच्या वैयक्तिक आक्षेप अर्ज भरून घेतील व ते व्यक्तिगत अर्ज नगरपरीषद प्रशासनाला 14 तारखेला मोर्चात सादर करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
