मोठी बातमी : अतिरीक्त पोलिस महासंचालक देवेन भारतींसह सात जणांविरोधात गुन्हा


मुंबई : बांग्लादेशी महिलेवर कारवाई न केल्याने अतिरीक्त पोलिस महासंचालक देवेन भारती (FIR Against ADG Deven Bharti), निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक फटांगडे यांच्यासह सात जणांविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात माजी वरीष्ठ पोलिस निरीक्षक दीपक कुरुलकर यांच्या तक्रारीन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस (Police) वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पासपोर्टसाठी संशयास्पद कागदपत्रांचा दावा
कुरुलकर यांनी पोलिसांना सांगितले की, 30 नोव्हेंबर 2017 मध्ये निवृत्त झालो. त्याआधी जुलै 2015 मध्ये माझी नियुक्ती स्पेशल ब्रांच-1 मध्ये वरीष्ठ पोलिस निरीक्षकपदी झाली. जुलै 2015 ते नोव्हेंबर 2017 मध्ये आम्ही एक यादी तयार केली होती. या यादीत त्यांनी पासपोर्ट तयार करण्यासाठी भारतीय नागरिकत्व असल्याचा पुरावा दिला मात्र, त्यांचे दस्ताऐवज संशयास्पद होते. या तपासादरम्यान, रेश्मा खान नावाच्या महिलेने पासपोर्टसाठी दिलेले दस्ताऐवज आमच्यासमोर आले. तिने सादर केलेल्या दस्ताऐवजात जन्माचा दाखला होता. त्यावर 24 परगाना पश्चिम बंगालमधील पत्ता होता. हा पत्ता पडताळणीसाठी एक पथक पाठवण्यात आले. मात्र, तिच्या जन्माच्या दाखल्याची नोंदच तिथं नसल्याचे आढळून आले. ही माहिती मला पडताळणी करण्यास गेलेल्या अधिकार्‍यांनी दिली. त्यानंतर मी मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगडे यांना या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी पत्र लिहिले मात्र फटांगडे हे रेश्माविरोधात गुन्हा दाखल करू देत नसल्याचे त्यावेळी तेथील पोलीस निरीक्षकाने मला तोंडी माहिती दिली असल्याचे कुरुलकर यांनी सांगितले.

गुन्हा दाखल केल्यास त्रास होण्याची धमकी
त्यानंतर फटांगडे यांनी मला त्यावेळी तत्कालीन सहआयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांनी गुन्हा दाखल न करण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. त्यानंतर देवेन भारती यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या केबीन बाहेर रेश्माविरोधात गुन्हा दाखल न करण्यास सांगितले. गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला त्रास होईल, या महिलेचा संबंध एका राजकीय नेत्यासोबत असल्याचे भारती यांनी सांगितले.

पोलिस ठाण्यातील कागदपत्रे नष्ट ?
कुरुलकर यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, या प्रकरणात ऑक्टोबर 2020 मध्ये मी माहिती अधिकार अंतर्गत या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची प्रत मागितली, त्यावर 2018 पर्यंतची अनेक कागदपत्रे नष्ट झाली आहेत, असे उत्तर मिळाले. त्यानंतर मी प्रथम अपील केले. त्यावर मागितलेली माहिती शोधून द्यावी असे निर्देश संबंधितांना देण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा मला कागदपत्रे नष्ट झाली असल्याचे उत्तर मिळाले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
कुरुलकर यांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी अतिरीक्त पोलिस महासंचालक देवेन भारती (Deven Bharti) , निवृत्त एसीपी दीपक फटांगडे आणि कथित बांगलादेशी नागरीक रेश्मा हैदर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा सध्या कुठे आहे याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. मालवणी पोलिस (Police) ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 465, 467, 468, 471,420 आणि 34 तसेच कलम 12 (1-अ) (अ) आणि (ब) भारतीय पारपत्र अधिनियम 1967 सह नियम क्रमांक 3, 6 पारपत्र (भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) 1950, सह कलम 3 पारपत्रान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम 1920 सह कलम 3 (1) विदेशी नागरिकाबाबतचा अध्यादेश 1948 सह कलम 13,14 (अ)(ब) विदेशी नागरिक अधिनियम 1946 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. गैरकायदेशीर कृत्य करत भारताची सुरक्षा धोक्यात आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !