कल्याण हादरले : सेवानिवृत्त मोटारमनचा मृतदेह आढळला तर पत्नी व मुलगा गंभीर

मुलगा म्हणाला : वडिलांनी आमच्यावर हल्ला करीत स्वतःला चाकूने वार करीत संपवले


कल्याण : सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह रहात्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला असून पत्नी आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील निखिल हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीत घडली. जखमींना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. प्रमोद बनोरीया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मध्यरात्री घटना घडल्याचा अंदाज
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीत बनोरिया कुटुंब चौथ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. मयत प्रमोद बनोरिया हे सेवानिवृत्त मोटरमन आहेत. कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवले, असे प्रमोद यांचा मुलगा लोकेशने पोलिसांना सांगितले. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

संशय आल्याने घटना उघडकीस
सेवानिवृत्त मोटरमन असलेले प्रमोद हे पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश यांच्यासह निखिल हाईटस सोसायटी येथे चौथ्या मजल्यावर वास्तव्याला होते. रविवारी सकाळी लोकेशने सोसायटीच्या वॉचमनला फोन करून रूग्णवाहीका हवी असल्याचे सांगितले. संशय आल्याने वॉचमनने ही बाब सोसायटीतील अन्य रहिवाशांना सांगितली. त्यांनी बनोरीया यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना एकच धकका बसला. प्रमोद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता तर त्यांचा मुलगा लोकेश आणि पत्नी कुसुम जखमी अवस्थेत आढळून आले. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.

पोलिसांची घटनास्थळी धाव
रहिवाशांनी तत्काळ याची माहीती महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी महात्मा फुले चौक पोलिस अधिकारी कर्मचा-यांसह पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील हे दाखल झाले. कौटुंबिक वादातून वडीलांनी आमच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वत:वर चाकूने वार करून आपले जीवन संपविले, अशी माहिती जखमी अवस्थेतील लोकेशने पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असून ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी, असाही अंदाज मांडला आहे.

तपासानंतर सर्व स्पष्ट होणार : एसीपी
तपासाअंती या प्रकरणातील तथ्य व काय घटना घडली हे समोर येईल. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल, असे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !