मुलगी झाली नकोशी : माय-बापांनी केलेला दिड लाखांचा सौदा पोलिसांनी उधळला
मुंबई : तीन मुलानंतर जन्मलेली मुलगी नकोशी झाल्याने भिवंडीतील मातापित्याने सहा दलालांच्या मदतीने पोटच्या गोळ्याचा ठरवलेला दीड लाखाचा सौदा ठाणे पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या असून नवजात बालिकेला डोंबिवलीच्या जननी आशीष चॅरीटेबल ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
या आरोपींना अटक
भिवंडीत राहणारे वकील अन्सारी याची पत्नी मुमताज अन्सारी हिने 4 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला, मात्र आधीच तीन मुले असल्याने चौथी मुलगी नको म्हणून या दोघांनी आपली मुलगी दीड ते दोन लाख रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मुमताजची बहीण कायनात खान (30), भाऊ मुझम्मील (18) याच्यासह दलाल झीनत खान, वसीम शेख यांची मदत घेतली. मात्र याचा सुगावा ठाणे गुन्हे शाखेला लागताच अधिकारी व अंमलदारांनी बनावट खरेदीदार बनवून या बालिकेच्या खरेदीसाठी संपर्क केला. त्यासाठी त्यांना ठाण्यातील पॅसलमिल नाका येथील स्वागत हॉटेल येथे येण्यास सांगितले व नंतर आरोपींना अटक करण्यात आली.

