बायकोपुढे रूबाब झाडण्यासाठी त्याने चोरल्या महागड्या गाड्या : आरोपी अखेर जाळ्यात


भिवंडी : बायकोला महागड्या कारमध्ये फिरविण्यासाठी शिवाय तिच्यापुढे रूबाब झाडण्यासाठी चोरट्याने तब्बल दहा महागड्या कार तसेच सहा दुचाकी चोरत 11 गुन्हे केले मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शिवसिंग असे या अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
भिवंडी शहरात विविध वाहने व सोनसाखळी, मोबाईल हिसकावून पळविण्याच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी सर्वच पोलीस ठाण्यात गस्त वाढविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पथकाने तपास सुरू केला. एक मंगळसूत्र लंपास करणारा चोरटा भिवंडीत टेमघर पाईपलाईन परीसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी शिवसिंगला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याचा चोरीच्या उद्देशाचा कारनामा समोर आला. आरोपीकडून आतापर्यंत 6 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी हस्तगस्त करून जप्त केला. तर पोलीस तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून यापूर्वी त्याने चार गुन्हे केले असून आतापर्यत 11 गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे. तर आणखी या सराईत आरोपीने गुन्हे केल्याची शक्यता असल्याने याचाही तपास शांतीनगर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, आरोपीचा 20 रोजी विवाह होणार होता मात्र त्यापूर्वीच त्याला बेड्या पडल्या आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !