चाळीसगाव-धुळे मेमूतून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही केला प्रवास
चाळीसगाव-धुळे मेमू धावली : ःराज्यमंत्री दानवेंनी दाखवली हिरवी झेंडी
भुसावळ : चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणार्या मेमू रेल्वे सेवेला सोमवार, 13 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. या शिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव ते भोरसदरम्यान मेमूतून कार्यकर्त्यांसह प्रवास केला.
चाळीसगावात यांची उपस्थिती
चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमास धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस.एस.केडिया, सहाय्यक प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी क्षितीज गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नवीन रेल्वेसाठी प्रयत्न : रावसाहेब दानवे
केंद्रीय रेल्वेमंत्री दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन रेल्वे सेवा, मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रीतपणे काम करण्यात येत आहेत. महसूल राज्यमंत्री सत्तार म्हणाले, मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा महत्वाकांक्षी सोलापूर-जळगाव रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रेल्वे सेवा व अन्य मार्गांसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
मेमूचे प्रवाशांकडून जल्लोषात स्वागत
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे दीर्घ कालावधीनंतर सुरू झाली. यामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रेल्वेला फुलांनी सजविण्यात आले होते. या नवीन गाडीच्या स्वागतासाठी चाळीसगावसह धुळेकरांनी गर्दी केली होती. मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर राज्यमंत्री सत्तार यांच्यासह रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्यांनी चाळीसगावपासून भोरस रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास केला.



