त्याने ‘आय लव बायको’ म्हणताच पोलिसांनी दाखल केला गुन्हा : घडले असे काही…
मोहोळ : पतीने फेसबुकवर ‘आय लव बायको’ म्हणून पोस्ट टाकली आणि एकाने स्क्रीनशॉट काढून बालविवाह उघडकीस आणला. याप्रकरणी कोन्हेरी येथील त्या नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलीच्या आईवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी व आई बेपत्ता असून, पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत.
अल्पवयीन मुलीसोबत विवाह भोवला
पेनूर तालुका मोहोळ येथील एका केवळ नऊ वर्षाच्या मुलीबरोबर 30 नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके (वय 21) याचा बालविवाह केला. दरम्यान, हे नवविवाहीत जोडपं देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाइलवर ‘आय लव बायको’ अशी कमेंट केलेला फोटो फेसबुक वर ठेवला होता. त्या ठेवलेल्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढत अज्ञात व्यक्तीने सोलापूर येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाइन क्रमांकावर फोन करत या बाल विवाहाची माहिती दिली.

बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क करत त्या ठिकाणाहून पोलीस कर्मचार्यांची मदत घेतली. कोन्हेरी येथे जाऊन चौकशी करीत अविनाश याने त्याच्या नातेवाइकाची नऊ वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके व पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अतुल वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, मुलीची आई व पीडित मुलगी सध्या बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
