आष्टा शिवारात एकाची हत्या? : तिघांना अटक


लातूर : तालुक्यातील आष्टा शिवारात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळून आला. याबाबत चाकूर पोलिसांनी तिघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हणमंत व्यंकटी येरवे (42) असे मयताचे नाव आहे. हणमंत येरवे (रा.चाकूर) हे दुचाकीवरुन रविवारी घराबाहेर पडले. त्यांचा रात्री दहापासून मोबाईल बंद असल्याचे दिसून आले, असे त्यांचे बंधू अमोल येरवे यांनी सांगितले. हणमंत येरवे यांची दुचाकी लातूर रोड नजीकच्या एका धाब्याशेजारी पडलेली सोमवारी आढळून आली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आष्टा शिवारात आढळून आल्याची माहिती मिळाली.

मृतदेहाशेजारी आढळली मिरची पावडर, रॉड व दोरी
चाकूर येथील सहायक पोलीस अधीक्षक अनिकेतन कदम, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, दामोदर सिरसाट, हणमंत आरदवाड, भागवत मामडगे, सुकेश केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अनोळखी मृतदेहाची ओळख पटली, तो हणमंत येरवे यांचा असल्याचे समोर आले. मृतदेहा शेजारी मिरची पावडर, रॉड, दोरी आढळून आली आहे. याबाबत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !