पोलिस अंमलदारांच्या कोणत्याही परीस्थितीत सुट्या थांबवू नका : पोलिस महासंचालक संजयकुमार पांडेय


मुंबई : पोलिस अंमलदारांच्या साप्ताहिक, वैद्यकीय व इतर प्रासंगिक सुट्या कोणत्याही परिस्थितीत थांबवू नका, असे स्पष्ट आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार पांडेय यांनी दिले आहेत. महासंचालक पांडेय हे आपल्या साप्ताहिक कामकाजाचा लेखाजोखा प्रत्येक आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करतात. यावेळी राज्यभरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आपल्या व्यथा ऑनलाईन त्यांच्याकडे मांडतात. सातत्याने थेट महासंचालकांकडे मांडल्या जाणार्‍या समस्यांचा ओघ पाहता पांडेय यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नियमित पोलिस दरबार भरविण्याचे आदेश दिले आहेत.

महासंचालकांनीच अखेर काढले आदेश
सुट्या मिळत नाहीत ही पोलिस अंमलदारांची नेहमीची समस्या आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक (गृह), राखीव पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांची बैठक घेतली होती. त्यात अंमलदारांच्या सुट्या मंजूर कराव्या, असे सांगितले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी खालपर्यंत होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुट्यांची ही समस्या सुटली नसल्याने महासंचालकांकडे यासंबंधीच्या तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत. एका जिल्ह्यात तर सीक पासही दिली जात नसल्याची तक्रार आली. त्या पार्श्वभूमीवर महासंचालक पांडेय यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यात अंमलदारांच्या सुट्या कोणत्याही परिस्थितीत थांबविल्या जावू नयेत, शक्य असेल तेवढ्या सुट्या दिल्याच पाहिजे, असे आदेश जारी केले. या कर्मचार्‍यांच्या सुट्या थांबवून फार काही साध्य होणार नाही, असेही महासंचालकांनी स्पष्ट केले.



कुटुंबातच कारवाई कशी करणार?
पोलीस अंमलदारांच्या सुट्या रोखल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा आपण दिला होता. मात्र, आपल्याच कुटुंबातील कुण्या सदस्यावर कारवाई करण्याची आपली मानसिकता नाही, त्यातून काही साध्य होणार नाही, तशी वेळही आपल्यावर आणू नये, असे महासंचालक पांडेय यांनी सांगितले.

अंमलदारांनीच हाताळल्या दंगली
महासंचालक संजय कुमार पांडेय यांनी सांगितले की, अलीकडेच अमरावती, नांदेड, मालेगाव येथे दंगली उसळल्या होत्या. या दंगली पुढे आणखी पसरवू न देता त्या नियंत्रीत करण्याची जबाबदारी पोलिस अंमलदारांनीच यशस्वीपणे पार पाडली. मी स्वत: कॅबीनच्या बाहेर निघालो नाही, काही घटक प्रमुखही कक्षातच राहिले, त्यानंतरही दंगल नियंत्रीत झाली, ती अंमलदारांच्या परीश्रमामुळेच, असेही महासंचालकांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !