विधान परीषद निवडणुकीत माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी
नागपूर : राज्याचे माजी उर्जामंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परीषद निवडणुकीत विजय मिळवला आहे. महाराष्ट्रातील विधान परीषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी झाली. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरूध्द काँग्रेसने आधी छोटू भोयर यांना उमेदवारी दिली. शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला मात्र ते पराभूत झाले आहेत.
भाजपाने मारली बाजी
नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला मात्र भाजपच्या नियोजनाने त्यांना यश मिळाले.


