हेलिकॉप्टर अपघातातून एकमेव बचावलेले कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन
बंगळुरू : सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. गत बुधवार, 8 डिसेंबर रोजी हवाई दलाच्या चॉपरला अपघात झाला. त्यामध्ये एकूण 14 जण होते. त्यातील 13 जणांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर बंगळुरूतील कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र मृत्यूसोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. भारतीय हवाई दलानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.
हेलिकॉप्टर अपघात सर्वच ठार
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत प्रवास करीत असलेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये 8 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता तर या अपघातातून एकमेव बचावलेले कॅप्टन वरुण सिंह यांचीदेखील बुधवारी प्राणज्योत मालवल्याने या अपघातातील मृतांची संख्या एकूण 14 वर पोहोचली आहे.




हेलिकॉप्टर दुर्घटना : संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू
पंतप्रधानांनी व्यक्त शोक
तमिळनाडूतील कुन्नरहून वेलिंग्टनला जात असलेल्या सीडीएस बिपीन रावत यांच्या चॉपरला अपघात होवून 13 जणांचा मृत्यू झाला होता तर वरुण सिंह अपघातातून बचावले. मात्र ते गंभीर जखमी होते. गेल्या गुरुवारी त्यांना उपचारांसाठी वेलिंग्टनहून बंगळुरूत हलवण्यात आलं. आठवडाभर ते मृत्यूशी झुंज होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ’ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानानं, शौर्यानं देशची सेवा केली. त्यांच्या निधनानं अतिशय दु:खी झालो आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा कधीच विसरू शकणार नाही. त्यांचं कुटुंब आणि मित्रांसोबत माझ्या सहवेदना आहेत,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अपघाताचे कारण अस्पष्ट
लष्कर वापरत असलेलं एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हिआयपी या विमानातून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते. मात्र तरीदेखील हा अपघाताचं नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
IAF is deeply saddened to inform the passing away of braveheart Group Captain Varun Singh, who succumbed this morning to the injuries sustained in the helicopter accident on 08 Dec 21. IAF offers sincere condolences and stands firmly with the bereaved family.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 15, 2021