जिल्ह्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे
भुसावळ : भाजपात असताना मोठ्या प्रमाणावर पक्ष विस्ताराचे काम केले मात्र मला जो झाला नाही तो पक्ष इतरांना काय होणार? असा सवाल खडसेंनी येथे उपस्थित केला. भुसावळातील डी.एस ग्राऊंडवर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते म्हणाले की, हा पक्ष प्रवेश सोहळा छोट्या स्वरूपात असून आगामी काळात भव्य स्वरूपाचा सोहळा अजितदादांच्या उपस्थितीत घेण्यात येईल. आता गावा-गावात व तांड्या-तांड्यावर पक्ष पोहोचण्याची जवाबदारी वाढली असून शहरातील साडेसहा हजार रेल्वे विस्थापीतांना घरकुलांची प्रतीक्षा असून हा प्रश्न सुटणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. घरकुलांच्या जागेवर आरक्षण बदलाबाबत मंत्रालयापर्यंत प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आगामी काळात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढणार
आगामी काळात होणार्या पालिका व जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत जिद्दीने काम केल्यास राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी प्रसंगी केले.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ.सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, चाळीसगाचे माजी आमदार राजीव देशमुख, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँक माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, एजाज मलिक, जि.प.चे माजी सदस्य संजय गरूड (शेंदुर्णी), भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, अनिकेत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मानले.
