राज्य परीक्षा आयुक्त तुकाराम सुपेकडे आढळले दोन कोटींचे घबाड


पुणे : राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्या असून त्यातून एक कोटी 98 लाख रुपयांची रोकड तसेच एकूण 44 वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास 2 कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

कोट्यवधी रुपये घेतल्याची कबुली
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने एक कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने एक कोटी 25 कोटी तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी 90 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. यात आणखी आरोपी आहेत, ही लिंक वाढत जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते एक लाख रुपये घेतल्याचं समोर आलं होतं.





दुसर्‍यांदा टाकली धाड
दुसर्‍यांदा टाकलेल्या धाडीमध्ये एक कोटी 98 लाखांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले आहेत. तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता. पोलिस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी एक कोटी 98 लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. याअगोदर तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख रुपयांची रोकड, दागिने, पाच लाख 50 हजारांच्या ठेवी असा 96 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

मुलीकडे बॅगा ठेवल्या
आरोपीकडे पैशांच्या दोन बॅगा होत्या. त्यापैकी त्याच्या मुलीकडे एक बॅग ठेवल्याची तसेच त्याचे जावयाने त्याच्या मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या चर्होली येथील घरी 97 हजार रुपये मिळाले मात्र दोन्ही बॅगा न मिळाल्याने अधिक चौकशीत नितीन पाटील याने त्याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील औरा कॉन्टी सोसायटीतील फ्लॅटची झडती घेतली. त्यात दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेस मिळाली. त्यातील पैशांची मोजदाद केली. त्यात 1 कोटी 58 लाख 35 हजार 10 रुपये इतकी रक्कम आढळली. बँगासोबत आढळलेल्या सुटकेस व एक बॅगमध्ये प्लॉस्टीकच्या पिशवीमध्ये दागिन्यांच्या 44 डब्या आढळून आल्या.

यांनी केली कारवाई
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक डफळ, पडवळ, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, नितिन चांदणे, कोमल भोसले, सौरभ घाटे यांनी ही कामगिरी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !