महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे अखेर निलंबित
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे तसेच शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय वर्षा गायकवाड यांनी दिली.
दीड कोटींच्या रकमेसह दीड किलो सोनं सापडलं
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तुकाराम सुपे यांच्या घरी याआधी 89 लाख रुपये आणि काही दागिने सापडले होते. आता पुन्हा माहिती घेऊन छापा टाकला असता, 1 कोटी 58 लाख रुपये रोख रक्कम आणि जवळपास दीड किलो सोन्याचे दागिने सापडले आहेत. आणखी तपास सुरूच आहेत.”
तुकाराम सुपे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच हे छापे टाकण्यात येत असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिलीय. “या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे. बाकी आरोपींसोबतचे संबंध शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत,” असं अमिताभ गुप्तांनी सांगितलं.

