मुक्ताईनगर तालुका ग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादीचे वर्चस्व
मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यात पाच जागांवर राष्ट्रवादीचे तर एका जागेवर शिवसेना उमेदवार विजयी : निकालानंतर जल्लोष
मुक्ताईनगर : तालुक्यात मंगळवार, 21 डिसेंबर रोजी वढोदा, दुई, महालखेडा, थेरोळा चिंचखेडा बु.॥ येथे सहा रीक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. दुसर्या दिवशी बुधवारी मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर एका जागेवर शिवसेना उमेदवाराचा विजय झाला. निकालानंतर उमेदवार समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
विजय उमेदवार असे
मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा येथे वॉर्ड क्रमांक चारमधून भास्करराव पाटील, थेरोळा येथे वॉर्ड क्रमांक एकमधून देविदास कांडेलकर, चिंचखेडा बु.॥ येथे वॉर्ड क्रमांक दोनमधून ज्योती विलास कांडेलकर, दुई येथे वॉर्ड क्रमांक एकमधून बेबाबाई उखर्डा भील, महालखेडा येथे वॉर्ड क्रमांक एकमधून मनिषा शालिग्राम कांडेलकर हे निवडणुकीत विजयी झाले. हलखेडा येथे सोनल अमोल पवार या बिनविरोध निवडून आल्या. बोदवड तालुक्यात कोल्हाडी येथे वॉर्ड क्रमांक एकमधून भीमा सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत. पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी उमेदवारांनी विजय मिळवला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँक संचालक अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी अभिनंदन केले. विजयानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला.


