अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या बालकाचा खून : आरोपी प्रेयसीसह प्रियकर सदस्य जाळ्यात


आष्टा : अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या प्रेयसीच्या मुलाच्या खूनप्रकरणी आष्टा पोलिसांनी शिराळा पंचायत समितीच्या सदस्याला प्रेयसीसह मंगळवारी रात्री अटक केली. अमरसिंह ऊर्फ अमर विश्वासराव पाटील (वय 36, रा. बिळाशी, ता. शिराळा, सध्या राहणार परेल पश्चिम, मुंबई) व प्राची सुशांत वाजे (29, रा.माळभाग, वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

संबंधात अडथळा ठरल्याने खून
इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून हे प्रकरण चर्चेत आहे. अमर पाटील शिराळा पंचायत समितीचा सदस्य आहे. तो कोकरूड गणातून निवडून आला आहे. त्याच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाळवा येथील सुशांत वाजे यांचा प्राचीसोबत प्रेमविवाह झाला आहे. त्यांना मनन हा मुलगा झाल्यानंतर प्राची वारंवार घरातून निघून जात असे. तिचे अमर पाटील याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सुशांत वाजे यांना होता.

मुंबईत झाला मुलाचा खून
ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या दरम्यान प्राची व मनन यांना अमरने मुंबई येथील घरी नेऊन ठेवले होते. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अमर व प्राची यांनी 6 ऑक्टोबर रोजी मननचा खून करून मोटारीतून (क्रमांक एमएच 13 एडी 8080) बिळाशी येथे आणून अंत्यसंस्कार केले व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. मननचा मृत्यू मुंबईत झाला असताना दोघांनी बिळाशीच्या ग्रामसेवकाला हा मृत्यू बिळाशीत झाल्याची खोटी माहिती दिली. यादरम्यान सुशांत वाजे यांनी दोघांविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. बाबर व पथकाने मोबाईलवरील तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबई व परिसरात माहिती घेऊन अमर पाटील यास आंबोलीतून, तर प्राचीला साकीनाका येथील लॉजमधून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मोटार जप्त करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !