अमळनेरात चाकूहल्ला व गोळीबार प्रकरण : दहा आरोपींविरोधात गुन्हा


भुसावळ/अमळनेर  : शहरातील शिरूड नाका भागातील कन्हैय्या मित्र मंडळाजवळ किरकोळ कारणावरून एका गटाने तरुणावर चाकू हल्ला करीत दुसर्‍याला जबर मारहाण केली. टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्ट्यातून हवेत दोन फैरी झाडल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी एका गटातील दहा तरुणांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून चाकू हल्ला
तक्रारदार दीपक गणेशराव पाटील (शिरूड नाका, अमळनेर) हा तरुण बुधवारी रात्री महापुरूषांचा फलक असलेल्या चबुतर्‍याजवळ आल्यानंतर त्याने येथे कोण थुंकले? असा प्रश्न शुभम शेटे व मनोज बिर्‍हाडे यांना विचारला असता संबंधितानी हुज्जत घातली व काही वेळात त्यांनी अन्य मित्रांनी बोलावल्याने वाद वाढला. मनोज बिर्‍हाडे याने आपल्याकडील चाकूने मानेवर हल्ला केला मात्र वार चुकवल्याने चाकूचा घाव डाव्या हातावर लागला तर विशाल सोनवणे, अरविंद बिर्‍हाडे, शुभम शेटे यांनी दीपक पाटील यास धरुन ठेवल्यानंतर मनोज व गौतम यांनी पाठीवर चाकूने वार केले तर मदतीसाठी धावून आलेल्या चेतन पाटील याच्यावर आरोपींनी हल्ला केल्याने तो देखील या हल्ल्यात जखमी झाला तर जमलेल्या टोळक्यातून कुणीतरी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत बंदुकीच्या दोन फैरी झाडल्या, असे फिर्यादीत दीपक पाटील यांनी म्हटले आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
चाकूहल्ला व हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्याप्रकरणी दीपक गणेशराव पाटील (शिरूड नाका, अमळनेर) या तरुणाने अमळनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी मनोज उर्फ आर्यमान मंगल बिर्‍हाडे, गौतम मंगल बिर्‍हाडे, अरविंद रवींद्र बिर्‍हाडे, राकेश रमेश बिर्‍हाडे, विशाल विजय सोनवणे, शुभम संजय शेटे यांच्यासह चार ते पाच अनोळखी तरुणांविरोधात भादंवि 307, 143, 147, 148, 149, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
दरम्यान, बुधवारी हवेत फायरींग झाल्याची व चाकू हल्ला झाल्याची माहिती कळताच अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, मिलिंद भामरे, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी यांनी धाव घेत शांतता निर्माण केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !