चाळीसगावात पानटपरी फोडली : 17 हजारांच्या सिगारेटसह रोकड लंपास
चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात असलेली पानटपरी फोडून चोरट्यांनी रोकडसह सिगारेट, तंबाखू मिळून 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश वाल्मीक भवर (42, रा.कृउबा समिती समोरील, रामवाडी, चाळीसगाव) हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ते पानटपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार, 22 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी पानटपरी बंद करून घरी निघाले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पानटपरी फोडून दुकानातील सिगारेटचे पाकीट, तंबाखूचे पुढे व रोकड असा एकूण 16 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे गुरुवारी पहाटे सहा वाजता उघडकीला आले. याप्रकरणी रमेश भवर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहे.




