बीएचआर घोटाळ्यातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारेला पुन्हा अटक


जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयीत तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला याची शुक्रवारी जामिनावर सुटका झाली खरी मात्र कारागृहातून तो बाहेर येत नाही तोच त्याला शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यामुळे जामिन मिळाल्याचा आनंद क्षणिक ठरला.

इंदौरमधून केली होती अटक
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला मात्र कंडारेची येरवडा कारागृहातून मुक्तता होण्याआधी शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासधिकारी पोलिस निरीक्षक सुरज बनगर, हवालदार रऊफ शेख यांच्यासह पथकाने त्याला पुन्हा शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटक केली.

शिक्रापूरच्या गुन्ह्यामुळे कंडारेच्या वाढल्या अडचणी
संतोष काशीनाथ कांबळे (57, रा.लोहगाव, पुणे) यांनी शिक्रापूर येथे तक्रार दिली आहे. ते सुरक्षारक्षकाची नोकरी करतात तर त्यांचे वडील काशिनाथ भगवान कांबळे हे 1990 मध्ये शिक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत. 2014 मध्ये कांबळे कुटुंबियांनी बीएचआर पतसंस्थेच्या संदर्भात आकर्षक व्याज देणारी जाहिरात एका वृत्तपत्रात पाहिली होती. संतोष कांबळे यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांनी वडीलांसोबत चर्चा करुन जवळ असलेला पैसा बीएचआरमध्ये ठेऊन त्याच्या व्याजावर घरखर्च करण्याची बोलणी केली. त्यानुसार काशिनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांनी पुण्यातील बीएचआरच्या भिमा कोरेगाव व शिक्रापुर या दोन्ही शाखांमध्ये विविध योजनेंतर्गत वर्षभरासाठी पैसे ठेवले. नंतर पुन्हा मुदत वाढवली. त्यांच्या ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळुन 18 लाख 7 हजार 159 रुपये त्यांना देय होते परंतू मुदत संपल्यानंतरही कांबळे यांना पैसे परत मिळाले नाही.

केवळ 20 टक्के रक्कम देण्याची ग्वाही
कांबळे 2015 मध्ये दोन्ही शाखांमध्ये गेले असता शाखा बंद पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे संतोष कांबळे हे वडीलांसह जळगावातील एमआयडीसी मख्य शाखेत आले त्या ठिकाणी त्यांना अवसायक जितेंद्र कंडारे भेटला. त्याने सांगितले की, पतसंस्था बुडाली असून आता माझी अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आम्ही कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांच्या फक्त 15 ते 20 टक्के रक्कम देत आहोत. बाकीची रक्कम बुडणार आहे. आमचे लोक तुमच्या घरी येतील, ते सांगतील तसे करा, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर ते म्हणतील तसे लिहुन देत सह्या करा. यानंतर तुम्हाला 20 टक्के रक्कम मिळेल, असे सांगत कंडारेने कांबळे यांच्या ठेवी, घराचा पत्ता, फोन नंबर लिहुन घेतला. कांबळे यांनी पुर्ण रक्कम परत मागितली असता कंडारेने त्यांना शिव्या देऊन बाहेर काढून टाकले. जेव्हढे भेटतील तेवढे घ्या नाहीतर एक रुपयाही मिळणार नाही, असे बोलून दोघांना धक्काबुक्की करून बाहेर काढून दिले. यानंतर वेळोवेळी कांबळे हे जळगावात आले परंतु बीएचआरच्या कर्मचार्‍यांनी त्यांना कंडारेस भेटु दिले नाही. 20 टक्के रक्कम घेऊन पावत्या विका, अन्यथा काहीच मिळणार नाही असेच सर्वजण त्यांना सांगत राहिले. सर्व मनस्तापानंतर त्यांनी 25 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्रापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !