पंडित नेहरूनंतर अटलबिहारी वाजपेयी हेच सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान : खासदार संजय राऊत
मुंबई : पंडित नेहरू यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हेच देशातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची शुक्रवारी जयंती असून त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
देशाचे नेतृत्व असावे तर असे !
या संदर्भात राऊत म्हणाले की, पंडित नेहरूजीनंतर अटलबिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षांचे ते लोकप्रिय नेते होते. ते आपल्या विचारधारेसोबत एकनिष्ठ होते. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले. देशाचे नेतृत्व कसे असावे हा परीपाठ आम्हाला त्यांच्याकडून मिळाला. हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत कधीही तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आणि देशातील एकात्मतेवर भर देऊन राजकारण करणारे अटलबिहारी वाजयेपयी होते. हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिवसेनेच्या झालेल्या युतीला वाजपेयी यांचे फार मोठे योगदान होते. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पंतप्रधान असताना ते अनेक विषयांवरुन बाळासाहेबांसोबत चर्चा करत होते. आज जो भारतीय जनता पक्ष दिसत आहे त्याचे स्तंभ आहेत अडवाणी आणि वाजेपयी. वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते, असेही संजय राऊत म्हणाले.



