मुलीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच माजी मंत्री खडसे नाशिकपासून फिरले माघारी
मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या संचालक अॅड.रोहिणी खडसे यांच्यावर पिस्टल, तलवार रोखून शिवसेना पदाधिकार्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना मानेगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री वाजेच्या सुमारास घडता राज्यभरात खळबळ उडाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही मोबाईलवर मुलीवर हल्ला झाल्याची माहिती कळताच त्यांनी मुंबई दौरा रद्द करून नाशिकपासून माघारी वाहन वळवत मुक्ताईनगर गाठले.
मुक्ताईनगरात वातावरण तापले
दोन दिवसांपासून खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर बदनामी आदी आरोप करीत गुन्हे दाखल केले होते. त्यातच राजकीय वातावरण मुक्ताईनगर तालुक्यात तापले असताना अॅड.खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.


शिवसेना पदाधिकार्यांकडून पिस्टल व तलवार रोखून हल्ला : अॅड.रोहिणी खडसे
रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी
ही घटना घडल्यानंतर सोमवारी रात्री अॅड.रोहिणी खडसे या आपल्या घरी पोहचल्या असता समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. स्वत:ला सावरत त्यांनी बराच वेळ थांबून असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घराबाहेर येऊन घेतली. यावेळी खासदार रक्षा खडसे, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व स्वीय सहायक योगेश कोलते यांनी धाव घेतली.
मानेगाव फाट्याजवळ पिस्टल व तलवार रोखली
अॅड.रोहिणी खडसे या चालक सचिन पाटील, स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे, यांच्यासोबत फॉर्च्युनर (एम.एच. 19 सी.सी.1919) सोमवारी रात्री साडेसात वाजता चांगदेव येथे हळद कार्यक्रमाला हजेरी लावून मुक्ताईनगराकडे येत असताना मानेगाव फाटा सोडल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर अचानक तीन दुचाकी आल्या व त्यांनी चारचाकी वाहनापुढे त्या आडव्या लावल्या. संशयीत सुनील काशीनाथ पाटील याने वाहनाच्या डाव्या बाजूने येवून पिस्टल रोखले तर चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्या हातात तलवार चकाकाली तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. आरोपींनी आपण बसलेल्या दिशेने काचेवर जोरात आघात केल्याने काच फुटला तसेच बोनटचे नुकसान झाले. या प्रकारानंतर आपण प्रचंड घाबरलो व चालकाने तातडीने तेथून गाडी काढली व आपण पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना घडलेली घटना कथन केली, असे अॅड.रोहिणी खडसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
शिवसेना पदाधिकार्यांसह सात आरोपींविरोधात गुन्हा
अॅड.रोहिणी खडसे यांच्या फिर्यादीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्यासह अन्य चार अनोळखींविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी भादंवि 307, आर्म अॅक्ट 3/25, दंगल आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
