तोतया मेजर अधिकारी लष्कराच्या जाळ्यात


नाशिक : आर्टिलरी सेंटरमध्ये जवानांच्या नातलगांसाठी सुरू असलेल्या भरतीमध्ये मेजर दर्जाच्या अधिकार्‍याचा गणवेश व त्यावर खोटा बॅज लावून वावरणार्‍या एका तोतयाला लष्करी इंटेलिजन्स विभागाने जेरबंद केले. त्याची वर्दी उतरवून लष्कराचा हिसका दाखवल्यानंतर त्याच्याकडे लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रातील छायाचित्रे व व्हिडिओही आढळून आली आहेत. लष्कराच्या संवेदनशील हद्दीतच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवार, 28 रोजी झालेल्या कारवाईत गणेश वाळू पवार (वय 26, हरसूल, ता.चांदवड) या संशयीताला अटक करण्यात आली.

अनेकांना गंडा घातल्याचा संशय
चौकशीत आरोपी गणेश पवाराने बेरोजगारांना लाखो रुपयांना ठगवल्याचीही माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्याने कमवलेल्या लाखो रुपयांच्या मायेतून एका अलिशान चारचाकीची रोख तर शहरात एका फ्लॅटचीही खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे. गणेश वाळू पवार असे या भामट्याचे नाव असून चांदवडमधील हरसूल येथील तो रहिवासी आहे. देवळाली कॅम्प पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी न्यायालयात सादर केले असता त्याला 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून फसवणूक सुरु असल्याची माहिती दक्षिण कमान पुणे, मिलिटरी इंटेलिजन्सच्या देवळाली कॅम्प येथील पथकाला मिळाली होती. एका मोठ्या चारचाकीतून (एम.एच. 15, जी.एक्स.4888) एक मेजर साहेब देवळाली कॅम्प परीसरात फिरत असून ते भरतीसाठी आलेल्या मुलांना भेटून त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करून घेत असल्याचे कळल्यानंतर इंटेलिजन्सने गाडीवर नजर ठेवली. 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी गाडी देवळाली कँम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये आली. मिलिटरी हॉस्पिटल गेट क्रमांक एकवरील गार्डने गाडी अडवून विचारपूस केली. यावेळी गणेश वाळू पवार नावाची व्यक्ती मेजरचा ड्रेस घालून बसलेली दिसली. सोबत ड्रायव्हर नीलेश छबू खैरे बसलेला होता. संशय बळावल्याने वरीष्ठ अधिकार्‍यांनी त्याची कसून चौकशी सुरु केली. यावेळी त्याला त्याचे वरिष्ठ अधिकारी, युनिट, ओळखपत्र, बॅजबाबत काहीच माहिती देता आली नाही. त्यानंतर तो तोतया असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची लष्कराची वर्दी उतरवून संतप्त लष्करी जवानाने त्याच्या कानाखाली आवाज काढला. त्यानंतर कबुलीत गणेश पवारने आपल्या घोट्याळ्यांचे कारनामे सांगितले. वरीष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लियाकत पठाण तपास करत आहेत.

भरतीच्या नावाखाली 3 ते 15 लाख उकळायचा
स्टेशन मुख्यालय देवळाली कॅम्प आणि आर्टिलरी सेंटर नाशिक येथे गट क मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गणेश पवार हा 3 ते 15 लाख रुपये उकळून तरुणांची फसवणूक करायचा. दिगंबर मोहन सोनवणे याच्याकडून 5 लााख, राजाराम शिंदे 4 लाख, नीलेश खैरे 3 लाख, परशुराम आहेर 15 लाख तर वैभव बाबाजी खैरेकडून 5 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

बनावट शिक्के वापरून 39 लाखांचे कर्ज
पवारच्या मोबाईलमध्ये मेजर रँक लावलेले फोटो व स्टेशन मुख्यालय देवळालीचा बनावट शिक्का वापरून बनवलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट, सर्व्हिस सर्टिफिकेट आढळून आले आहे. या कागदपत्रांचा वापर करून त्याने चांदवडमधील एका बँकेकडून 39 लाखांचे कर्ज घेतले आहे.

वडिलांनी दिले होते गावाला जेवण
मुलगा लेफ्टनंट झाल्याने वडिलांनी केला दीड ते पावणेदोन लाखांचा खर्च
लष्करात लेफ्टनंट कर्नल झाल्याचे मुलाने सांगितल्यानंतर सेवानिवृत्त लष्करी जवान असलेले त्याचे वडील वाळू पवार यांनी गावात भव्य सत्कार समारंभ करून संपूर्ण गावाला जेवण दिले होते. त्यासाठी त्यांना दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा खर्च आला होता. मात्र मुलगा कुटुंबासह देशाशीही खोटं वागेल असे मनातही आले नव्हते असे वडील वाळू पवार यांनी अश्रू ढाळत सांगितले.

बीएस्सी झालेली पत्नीदेखील अनभिज्ञ
प्रत्यक्षात कला शाखेची पदवी घेतलेल्या गणेश पवारने 2017 च्या बॅचमध्ये लेफ्टनंट झाल्याचे भासवत बीएससी झालेल्या सटाणा येथील गीतांजलीसोबत गतवर्षी जानेवारीमध्ये विवाह केला. मात्र पत्नीलाही गणेशने आपल्या कारनाम्यांपासून अनभिज्ञ ठेवले होते.

बेकायदेशीर नंबर प्लेट ; पोलिस यंत्रणा निद्रेत
खासगी वाहनांवर लष्कराची कोणत्याही प्रकारची पदवी, पदनाम लिहिणे व तशी नंबरप्लेट लावणे बेकायदेशीर आहे. सेवा बजावताना तसेच निवृत्तीनंतरही यास लष्करी कायद्यात परवानगी नाही. अशा वाहनांवर कारवाईसाठी शहर वाहतूक विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे परंतु पोलिस यंत्रणा निद्रेत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !