नागपूरातील संवेदनशील ठिकाणांची ‘जैश ए मोहम्मद’ संघटनेकडून रेकी : गुप्तचर संस्थेचा अहवाल !
नागपूर : ‘जैश ए मोहम्मद’ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडून नागपूर येथील काही संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला आहे.
या ठिकाणांची केली रेकी
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल परीसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचे डॉ.हेडगेवार स्मृती मंदिर परीसरासह इतर काही संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेत तेथील सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून याप्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेंट्रल एजन्सीने दिली माहिती
पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाने जुलै महिन्यात नागपूर येथे दोन दिवस मुक्काम करत काही ठिकाणाची रेकी केली असून त्याला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सेंट्रल एजन्सीने सर्व माहिती नागपूर पोलिसांना दिली आहे.
