मुलगी झाली नकोशी : नराधम पित्याकडून मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न
नाशिक : बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उजेडात आली आहे. बापानेच आपल्या लेकीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी बहुल असलेल्या दिंडोरी तालुक्यातील या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेली कसून चौकशीत ही बाब समोर आली आहे.
जंगलात घडली घटना
शुक्रवार, 7 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास देहरेवाडी येथील गुराखी नारायण गांगुर्डे हे आपले नेहमीप्रमाणे जनावरे चारत असताना, जंगलात काहीतरी आवाज व झटापट होत असल्याची जाणीव झाली. त्यांनी पाहणी केली असता, एक इसम मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले. गांगुर्डे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, दाट झाडे-झुडपांचा फायदा घेत तो पसार झाला. सदर घटना त्यांनी रवळगावचे पोलीस पाटील साहेबराव साळवे यांना कळविली. त्यांनी दिंडोरी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी सदर मुलीला तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी पाहणी करून, अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या अंगात पिवळ्या गर्द रंगाचा फ्रॉक, पायात काळे बूट व नाकात तांब्याच्या धातूची मोरणी घातली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयीत इसमास शोधून काढले असून हा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क मुलीचा बापच या घटनेमागे असल्याचे तपासात समोर आले.

बापाने रचला प्लॅन
घरगुती भांडणातून मुलगी नकोशी झाल्याने जंगलात नेऊन मुलीला संपवण्याचा प्लॅन या बापाने रचला होता. मात्र येथील गुराख्यानी तो प्रयत्न हणून पाडला. मुलगी नकोशी झाली म्हणून बापानेच तिचा काटा काढायचा प्लॅन केला होता. यासाठी दिंडोरी तालुक्यातील देहेरवाडीच्या जंगलात तिला आणले होते. यावेळी फासावर लटकवत असतांना गुराख्यानी पहिले. तिथून या बापाने धूम ठोकली. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
