खिर्डी परीसरात हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव
शेतकरी झाले हवालदील : लाखो रुपयांचा खर्च गेला वाया : शेतकर्यांकडून पिके वाचवण्याचा प्रयत्न
खिर्डी : अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. पिकावर केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी अक्षरशः कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी वर्गाने नाउमेद न होता रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करीत गहू, हरभरा, मका आदी पिकांची शेतात मोठ्या प्रमाणात लागवड केली. लागवडीनंतर पिकांची उगवणही चांगली झाली व पिकेही चांगली आली मात्र वातावरणात सतत बदल होत असल्याने तसेच दव, थंडी व उष्ण वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गाने विविध प्रकारची बुरशीनाशक, कीटकनाशक औषधांची फवारणी करून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
शेतकर्यांमध्ये पसरली चिंता
सध्या हरभरा पिकाला मोठ्या प्रमाणात फुलोरा व घाटे लागले आहेत मात्र हरभरा पिकावर अळीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळी ही घाट्याच्या आतमध्ये जात असल्याने औषध फवारणीचा अळीवर परीणाम होत नाही. या अळीमुळे हरभरा उत्पादनात निम्याने घट येणार असल्याने शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


