भुसावळातील आदिती पतंगेला ‘मिस इंडिया वॉशिंग्टन’चा बहुमान
भुसावळ : भुसावळातील आदिती पतंगे (Aditi Patange) या तरुणीने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021’ (Miss India Washington USA 2021) हा अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान पटकावून भुसावळचा नावलौकीक वाढवला आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून असलेल्या बेस्ट स्माईलची देखील ती विजेती झालेली आहे. तीन दिवसीय ही स्पर्धा सिआटल शहरात नुकतीच झाली.
अदितीचा जन्म भुसावळचा
आदिती (Aditi Patange) ही संगीता (मांडवगडे) पतंगे (Sangita Patange) व प्रवीण पतंगे (Pravin Patange) यांची एकूलती एक कन्या आहे. आईचे माहेर भुसावळचे असून अदितीचा जन्मदेखील भुसावळ येथे झाला असल्याने शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आदितीचे बारावी पर्यंतचे शिक्षण हे पुणे येथे झाले असून अवघ्या 17व्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी अमेरीकेत गेली. तिथे बी.एस. (कॉम्प्युटर इंजिनिअरींग) ही पदवी मिळवली. तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती मायक्रोसॉफ्ट ह्या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाली.
मॉडेलिंग व अभिनयाची आवड
बालपणापासूनच अदितीला (Aditi Patange) मॉडेलिंग व अभिनयाची आवड होती. पेंडॅमीक कालावधीत तिने घरून काम करून, घर सांभाळून अतिशय चिकाटीने एम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021’ स्पर्धेत भाग घेतला. त्यात 22 स्पर्धकांमधून ती प्रथम विजेती ठरली.
असे होते स्पर्धेचे स्वरूप
स्पर्धेचे स्वरूप टॅलेंट राऊंड, इंटरव्ह्यू, लेहेंगा राऊंड, इंट्रोडक्शन, इवेनिंग गाऊन राऊंड आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न-उत्तर राऊंड असे होते. ही स्टेट लेव्हल (State Leval) स्पर्धा होती. सर्व स्पर्धक वॉशिंग्टन स्टेट (Washington USA) मधले होते. एकूण या स्पर्धेत 22 स्पर्धक होते. जुलै 2022 मध्ये ती नॅशनल लेवल ‘मिस इंडिया युएसए’ मध्ये वॉशिंग्टनची (Washington) प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे. आदितीने (Aditi Patange) सातासमुद्रापार मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


