खिर्डीत दारू दुकानाला परवानगीच्या बोगस ठरावावरून ग्रामस्थ संतप्त
दोषी सदस्यांसह ग्रामविकास अधिकार्यांवर कारवाईची मागणी ः पोलिसांची वेळीच धाव
खिर्डी : बनावट कागदपत्रे सादर करून देशी दारू दुकानाला परवानगी देणारा ठराव सादर करण्यात आल्याची बाब खिर्डीकरांना मंगळवारी कळताच त्यांनी संतप्त होत ग्रामविकास अधिकारी विजयकुमार महाजन यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. खिर्डीतील वातावरण पेटल्याची माहिती गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना कळताच त्यांच्यासह डी.एस.महाजन आदींनी ग्रामपंचायतीत धाव घेत ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन करीत या संदर्भात कारवाईचे आश्वासन दिले. निंभोरा पोलिसांनीही धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली.
खोटा ठराव बनवण्यात आल्याचा आरोप
खिर्डी येथील दारू विक्रीस बंदी असताना व त्याबाबत ठराव केला असतानाही 30 मे 2021 रोजीच्या तारखेत ग्रामविकास अधिकारी व काही ग्रामपंचायत सदस्यांनी देशी दारू दुकानाला परवानगी दिल्याची बाब उघड झाली आहे. वास्तविक 30 मे रोजी झालेल्या सभेत दारू दुकानाला परवानगी देण्याचा विषय झाला नसताना ग्रामविकास अधिकार्यांसह काही सदस्यांनी संगनमतांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तांदलवाडी गावातील देशी दारूचे दुकान खिर्डीत स्थलांतरीत करण्यासाठी ठराव झाल्याची माहिती ग्रामस्थांना मंगळवारी कळताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत जाब विचारला. खोटा ठराव रद्द करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी लावून धरली तसेच दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
पोलिसांची वेळीच धाव
खिर्डी गावातील वातावरण पेटल्याची माहिती कळताच निंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे, हवालदार स्वप्नील पाटील, बापू पाटील व कर्मचार्यांनी धाव घेत ग्रामस्थांना शांत केले. दरम्यान, 2017 मध्ये महिलांनी दारू बंदीसाठी ठराव करीत मतदान करून बाटली आडवी केली होती मात्र पुन्हा दुकान सुरू करण्याच्या हालचाली झाल्याने महिलावर्गाने तीव्र संताप व्यक्त केला.
ग्रामपंचायत सदस्यांमधून उमटल्या प्रतिक्रिया
खिर्डी येथे दोन वर्षापूर्वी सुद्धा गावात दारूबंदीसाठी मी व माझ्या परीवाराने तन-मन-धनाने पुढाकार घेतला मात्र गावात दारूबंदी होवून सुद्धा गावात पूर्वीपेक्षा जास्त दारू विक्री सुरू आहे. आज ठरावाला विरोध करणारे बहुतांशी लोक त्या वेळेस मला मूर्ख समजून हसत होते मात्र आता अवैध विक्री होत असली तर का वैध व्यवसाय करू नये, असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य किरण नेमाडे यांनी उपस्थित केला. झालेला ठराव हा बेकायदेशीर असून ग्रामविकास अधिकारी यांचा मनमानी कारभार असल्याचे प्रभारी सरपंच वैशाली पाटील म्हणाल्या. ग्रामपंचायत सदस्यांनी आर्थिक चिरीमिरी करून गौडबंगाल केले असून यात जे सहभागी असतील त्यांवर रीतसर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जगदीश कोचुरे यांनी केली.


