धक्कादायक ! : लग्नास नकार देणार्या प्रियकराला प्रेयसीने चाकूने भोसकले
नागपूर : लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला चढवून चाकूने वार केले. तो जखमी अवस्थेत घराबाहेर पळाल्याने बचावला. आरोपी प्रेयसी ही घटस्फोटीत असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली असून, तिला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना वाडी शहरातील दत्तवाडी परिसरात सोमवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास दिली. अक्षय कृष्णाजी ढोके (27, रा. गुरुप्रसादनगर, दत्तवाडी, वाडी) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. तो वाडी परिसरातील बिस्कीट कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्याचे 30 वर्षीय महिलेशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही कारणांमुळे महिनाभरापासून त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाल्याने अक्षयने तिच्याशी असलेले मैत्रीचे संबंध तोडले होते. त्यामुळे ती संतापली होती.
भांडणानंतर केला चाकू हल्ला
ती सोमवारी रात्री अक्षयच्या खोलीवर गेली आणि तू माझ्याशी मैत्री का तोडली, लग्न करण्यास नकार का दिला, अशी अक्षयला विचारणा करीत त्याच्याशी भांडायला लागली. याच भांडणात तिने अक्षयवर चाकूने वार केले. त्यामुळे स्वत:ला वाचविण्यासाठी वाचवा-वाचवा ओरडत बाहेर पळला. त्यातच परीरातील दुकानदार व इतर नागरीक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी अक्षयला लगेच वाडी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. माहिती मिळताच पोलिसांनी अक्षयला गाठून त्याचा जवाब नोंदवून घेत प्रेयसीविरुद्ध भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकव्हर करीत आहेत.

