सेवानिवृत्त शिक्षकाला भामट्यांनी घातला दहा लाखांचा गंडा
केवायसीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक : सायबर पोलिसात गुन्हा
जळगाव : बीएसएनएलचे कनेक्शन बंद होत असल्याने केवायसी करावी लागेल तसेच त्यासाठी क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगून सेवानिवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यातून नऊ लाख 90 हजार रुपये परस्पर अन्य खात्यात वळवून घेण्यात आल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी सायबर पोलिसात (cyber police) गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
शहरातील बी.जे.नगरातील सेवानिवृत्त शिक्षक विनोद गेंदालाल कोचुरे (60) यांना रविवारी दुपारच्या सुमारास त्यांना दोन अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. अज्ञताने विनोद कोचुरे यांना तुमचे बीएसएनएल (bsnl) कनेक्शन बंद होत आहे, ते कनेक्शन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागेल, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला तसेच त्यासाठी तुम्हाला दहा रुपयांचा रीचार्ज करणे गरजेचे आहे, असेदेखील त्यांनी विनोद कोचुरे यांना सांगितले.




परस्पर वळवले खात्यात पैसे
फोन करणार्याने विनोद कोचुरे यांना त्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरुन बीएसएनएल केवायसी क्विक सपोर्ट नावाचे अॅॅप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी हे अॅप डाऊनलोड करताच संबधिताचे त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेवून त्यांच्या एसबीआयच्या बँक खात्यातील 9 लाख 90 हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात (cyber police) गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे (pi liladhar kande) करीत आहेत.
