महाराष्ट्र पोलिस दलाला सात शौर्य पदकांसह 40 पोलिस पदक जाहीर


पुणे : महाराष्ट्र पोलिस दलाने सात शौर्य पोलिसस पदक, 4 विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि 40 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक पटकाविले असून महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिकार्‍यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणार्‍या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला आहे.

स्मृतींना केले वंदन
अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतीही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे.

यांना शौर्य पदक जाहीर
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील 40 अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर
महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !