फुलगाव रेल्वे गेटजवळ पुलाखाली रस्ता तयार करावा
खासदार, आमदारांसह नहींच्या सिन्हा यांच्याकडे भाजपाची मागणी
वरणगाव : फुलगाव रेल्वे गेट बंद केल्यामुळे वरणगाववरून भुसावळकडे व भुसावळ वरणगाव येण्यासाठी उड्डाण पुलावरून जावे लागत असल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तात्पुरता पर्याय म्हणून बंद असलेल्या फुलगाव रेल्वे गेटजवळील छोटा बोगदा तयार करण्यात आला असलातरी हा बोगदा अरुंद स्वरूपाचा असून त्या रस्त्यावरून टर्निंग पॉइंट सुद्धा काढलेले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अनेक नागरीक रात्रीच्या वेळी ये-जा करण्यास घाबरत असून नहींचे प्रकल्प संचालक यांनी या बोगद्याची पाहणी करावी तसेच बोगदा मोठ्या स्वरूपाचा करावा तसेच टर्निंग पॉईंट सुद्धा व्यवस्थित करावा तसेच लुंबिनी नगराकडे जाण्यासाठी अॅप्रोच रस्ता तयार करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी प्रकल्प संचालक सिंहा, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्याकडे करण्यात आली आहे. मंगळवारी रेल्वे पुलाजवळ जाऊन माजी नगराध्यक्ष सुनील काळे, किसान मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, कमलाकर मराठे, भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सिद्धांत चौधरी, तालुका उपाध्यक्ष संदीप भाई, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू चौहान यांनी उभयंतांकडे ही मागणी केली आहे.


