भुसावळ विभागातून ताशी 130 वेगाने धावणार गाड्या
भुसावळात मध्य रेल्वेचे जीएम अनिलकुमार लाहोटी : चाकरमान्यांना लवकरच पास सुविधा मिळणार
भुसावळ : विभागातील रूळ व जमीन चांगली आहे. त्यामुळे लवकरच भुसावळ विभागात ताशी 130 च्या वेगात मेल, एक्स्प्रेस या गाड्या धावू लागतील, त्यामुळे गाड्यांचा वेळ वाचणार असून प्रवाशांना लवकरच इच्छीतस्थळी पोचता येणार आहे. त्यामुळे भविष्यात भुसावळ विभागातील रेल्वे गाड्या धावण्याचा वेग हा ताशी 130 किलोमीटर असेल, असे मध्य रेल्वेचे जीएम अनिलकुमार लाहोटी (Relway GM Anilkumar Lohoti) यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. लाहोटी हे शुक्रवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर (Bhusawal Division Daura) होते. दौर्यादरम्यान विशेष जीएम स्पेशल गाडी ही ताशी 130 किमी वेगाने चालवून ट्रायलही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाचही विभागातील मेमू शेडच्या लवकरच सुरवात
मध्य रेल्वेतील पाचही विभागातील मेमू कारशेड हे भुसावळ येथे उभारले जाणार आहे, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे मोठा प्रकल्प भुसावळात सुरू होणार आहे. पटना येथील एजन्सीतर्फे हे काम केले जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) अनिलकुमार लाहोटी यांनी आयोजीत पत्रकार परीषदेत दिली. यावेळी डीआरएम एस.एस. केडीया व अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांचा शुक्रवारी भुसावळ दौरा होता, मनमाड ते भुसावळ सेक्शनची पहाणी त्यांनी केली. नांदगाव येथून पाहणी करण्यास सुरूवात केली. रेल्वे कर्मचारी कॉलनी, रेल्वे स्थानकांसह परीरसर आणि अन्य कामांची पाहणी केली. पत्रकार परीषदेला डीआरएम एस.एस. केडीया, एडीआरएम नवीन पाटील, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार आदी अन्य वरीष्ठ अधिकारी व मुंबईतील अधिकारी उपस्थित होते.
शंभर एकर जागेवर मेमू शेड होणार
रेल्वेने 150 एकर जागेवरील अतिक्रमण काढले असून त्यावर अद्याप कुठलाही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही या प्रश्नावर जीएम लाहोटी (Relway GM Anilkumar Lohoti) यांनी सांगितले की, अतिक्रमणाच्या जागेवर कोच फॅक्टरी उभारली जाणार होती, मात्र कोच फॅक्टरीच्या ऐवजी आता मेमू कार शेड मेमू रेल्वे गाड्यांचे वर्कशॉप सुरू केले जाणार आहे. 150 कोटी रूपये खर्चाचे मेमू शेडच्या निर्मीतीसाठी रेल्वे प्रशासनाकडून निवीदा प्रक्रिया पार पडली आहे. सुमारे 100 एकर जागेवर हे मेमू शेडचे निर्माण होणार आहे. भुसावळ येथे आता मेमू गाड्या सुरू झाल्या असल्याने त्या गाड्यांची देखभाल करण्यासाठी मेमू वर्कशॅाप शेडची निर्मीती केली जात आहे. मध्य रेल्वेतील नागपूर, मुंबई, पुणे, सोलावूर या चारही विभागातील हे पहिलेच मेमू वर्कशॉप भुसावळात राहणार आहे. अन्य चारही विभागातील मेमू गाड्या सुध्दा येथे देखभाल, दुरूस्तीसाठी येतील त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हातालाही काम मिळणार आहे.
पाचोरा-जामनेर नॅरोगेजचे इंजीन, डबे कालबाह्य
पाचोरा-जामनेर नॅरोगेज गाडीचे दोन्ही इंजिन आणि डबे हे कालबाह्य झाले आहे. कोरोनाच्या काळातच ही गाडी बंद करण्यात आली आहे. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी मंजूरी मिळाली असून तिन्ही विभागांकडून होणारा सर्व्हे सुध्दा होत आहे. तो सुध्दा रेल्वे बोर्डाला पाठवून मार्चपर्यत त्यावर निर्णय होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रीया सुरू केली जाणार असल्याचे जीएम लाहोटी यांनी सांगितले.
चाकरमान्यांना लवकरच पास
भुसावळ येथून अपडाऊन करणार्या प्रवाशांना मासिक पास का दिला जात नाही, याबाबत त्यांनी सांगितले की, कोरोना संसर्गामुळे पास बंद केला आहे. मात्र लवकरच ळी प्रक्रियाा सुरू केली जाणार आहे. आता प्रवासी तिकीटावर चाकरमान्ये प्रवास करीत आहे, पास बाबत सुध्दा रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावाला मंजूरी मिळताच पास दिला जाईल. प्रवाशांना मिळणार्या अन्य सुविधा सुध्दा मिळत नाही, याबाबत त्यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर अन्य सुविधा सुध्दा पूर्ववत केल्या जातील.


