मुक्ताईनगरात खतांच्या दरवाढीविरोधात धरणे आंदोलन

राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन


मुक्ताईनगर : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खत व कृषी मंत्रालयाने गेल्या महिन्यात रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड दर वाढ करून शेतकर्‍यांना संपवण्याचा घाट घातला आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शनिवार, 29 रोजी दुपारी एक वाजता मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील पुरनाड फाट्यावर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

घाम गाळणारा शेतकरी संकटात
रासायनिक खतांच्या किंमती आडून शेतकरी विरोधी असलेले मोदी सरकार बळीराज्याचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. गत महिन्यापर्यंत पोटॅशचे दर 850 होते तर 10:26:26 ह्या खताचे दर 1175 होते परंतु आता पोट्याश 1780 तर 10:26:26 चे भाव हे 1640 च्या वर गेले आहे. आधीच निसर्गाचा लहरीपणा त्यात ह्या सुलतानी मोदी सरकारने खतांचे भाव हे शेतकर्‍यांच्या आवाक्या बाहेर केले आहेत. त्यामुळे शेती करावी किंवा नाही हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पडला आहे. जीवाचे रान करून व दिवस रात्र एक करून घाम गाळणारा बळीराजा आज दुहेरी संकटात सापडला आहे, सर्वच स्तरातून त्याची पिळवणूक होत असतांना केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या समोर आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

वीज तोडणी तत्काळ थांबवावी
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी कृषी पंपांची वीज तोडणी तत्काळ थांबवण्याची यावेळी मागणी केली तसेच घरकुलांचे बांधकाम करणार्‍या सामान्य जनतेला रेती उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारला निवेदन दिले. धरणे आंदोलना प्रसंगी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परीसर दणाणून सोडला.
परीसरातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

यांचा धरणे आंदोलनात सहभाग
प्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे-खेवलकर, माजी सभापती सुधाकर पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, मार्केटचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य किशोर चौधरी, विलास धायडे, राजू माळी, डॉ.प्रदीप पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पांडुरंग, लिलाधर पाटील, भाऊराव पाटील, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, साहेबराव पाटील, जितेंद्र पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, सोपान दुत्ये, दिलीप पाटील, सोनू पाटील, संजय पाटील, राजेश ढोले, सईद खान, नंदू हिरोळे, सारंगराजे, कपिल पाटील, आकाश सुरवाडे, मयूर पाटील, पवन डापके, मनोज पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, समीर शा, गोकुळ अटकाळे, योगेश पाटील, चेतन राजपूत यांच्यासह राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !