भुसावळातील जबरी चोरीसह शस्त्र बाळगणार्या 32 संशयीतांची पोलिसांकडून ‘ओळखपरेड’
भुसावळ : भुसावळ शहर हद्दीतील 11 तर बाजारपेठ हद्दीतील 21 संशयीताची शनिवारी ओळखपरेड घेण्यात आली. जबरी चोरी, शस्त्र अधिनियमाखालील ज्या संशयीतांकडे गावठी पिस्तूल आणि हत्यारे मिळून आली अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ओळखपरेड घेतली. दरम्यान, संशयीतांना यावेळी पोलिसांनी चांगल्या वर्तनाची समज देत समाजाच्या प्रवाहात येवून चांगले काम करण्याचे आवाहनही केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी संशयीतांची सविस्तर विचारपूस करून विचारपूस फॉर्म, इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. त्यामध्ये संशयीताची सध्या स्थिती मध्ये काय करतो?, कोणते वाहन वापरतो?, कोठे राहतो?, त्याचे मित्र कोण आहेत?, कोणते काम करतो?, कामाचे स्वरूप काय?, त्यातून त्याला किती रक्कम मिळते?, सध्याचा वापरता मोबाईल कोणता? आदी सर्व बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांच्याकडून शहरातील अन्य सक्रिय असणार्या गुन्हेगारांची सुध्दा विचारपूस करून माहिती घेण्यात आली. या ओळख परेडमधून काही सक्रीय गुन्हेगारांची नावे उघड झाले आहे, त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. मागील वर्षीच संशयीत यांचा वेगवेगळ्या हेड खाली गुन्हे करणार्या संशयीतांच्या याद्या तयार करण्यात आल्यात. त्यामध्ये घरफोडी करणारे संशयीत, जबरी चोरी करणारे संशयीत, वाहन चोरी करणारे संशयीत, गावठी पिस्तूल बाळगणारे संशयीत अशा वेगवेगळ्या हेड खाली केलेल्या या याद्या मधून शनिवारी जबरी चोरी करणारे व शस्त्र अधिनियमाखालील रेकॉर्डवरील संशयीतांना बोलावण्यात आले होते.


